आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

शरद पवार यांचा फेसबुकद्वारे जनतेशी संवाद; म्हणाले कठोर निर्बंध हाच पर्याय

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा रुद्रावतार पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. राज्यातील आरोग्य क्षेत्राशी निगडीत सर्वच घटक सध्या मेहनत घेत आहेत. राज्य सरकारनेही काही निर्बंध लागू केले आहेत. सद्यस्थिती पाहता काही निर्बंध आवश्यक असून त्याशिवाय संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रशासनाला जनतेने सर्वतोपरी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

राज्य सरकारने गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यावरून काही घटकांमधून विरोध होत आहे. याबद्दल बोलताना शरद पवार यांनी निर्बंध लादल्याशिवाय संसर्ग नियंत्रणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाकडूनही काही निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना राज्यातील स्थितीची माहिती दिली आहे. राज्यात ज्या काही त्रुटी आहेत त्याबद्दलही आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. केंद्र सरकार आणि केंद्राची यंत्रणा राज्यांच्या सोबत आणि महाराष्ट्रासोबत असल्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला झळ बसली आहे. उद्योगधंदे बंद झाल्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. पालेभाज्यांचे उत्पादन घेणारेही शेतकरीही चिंताग्रस्त बनले आहेत. शेतकरीही सद्यस्थितीत अडचणीत आला आहे. या सर्वातून बाहेर पडायचे असेल तर या सर्व परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे जाणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मी समाजातील सर्वच घटकांना  विनंती करतो की, आपल्याला वास्तुस्थिती नाकारता येणार नाही. नागरिकांच्या जिवीताच्या संरक्षणार्थ काही अपरिहार्य निर्णय घेतले जातात. त्यामध्ये सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.  प्रसार माध्यमांपासून, राजकीय नेते, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना आग्रहाची विनंती करतो की कोरोना काळात राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असं म्हणत राज्यातील जनता यंत्रणेला सहकार्य करतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सोबतच सामुदायिक प्रयत्नांच्या माध्यमातून आपण कोरोनावर नक्कीच मात करु असा दृढ निश्चयही त्यांनी व्यक्त केला. 


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us