
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या बीबीए-सीए, बीसीएस, बीसीए विभाग आणि पुण्यातील ऑरेंज आय टेक कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर तंत्रज्ञान, संशोधन आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य, डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद, बी.बी.ए.(सी.ए.) विभागप्रमुख महेश पवार, संगणक शास्त्र विभाग प्रमुख गजानन जोशी, बीसीए(सायन्स)विभागप्रमुख किशोर ढाणे आणि ऑरेंज आय टेकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना निगडे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
हा करार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान संशोधन, नावीन्य, उद्योजकता आणि नोकरीच्या संधींच्या बाबतीत जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच नावीन्यपूर्णतेद्वारे विद्यार्थ्यांना समृद्ध करण्याचे महाविद्यालयाचे ध्येय पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना तयार करणे असे एकत्रितपणे उद्दिष्ट या कराराद्वारे पार पाडले जाणार आहे.
या करारासाठी गौतम कुदळे, जगदीश सांगवीकर, विशाल शिंदे, अनिल काळोखे, कांचन खीरे, अक्षय शिंदे, पुनम गुंजवटे, अक्षय भोसले, सलमा शेख, वैशाली पेंढारकर यांच्यासह संगणकशास्त्र आणि बीसीए विभागातील सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.