बारामती : प्रतिनिधी
बारामतीत सुरु असलेल्या बेकायदेशीर ॲकॅडमीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश नोंदवणाऱ्या बारामती शहर व तालुक्यातील शाळांची चौकशी करण्याच्या सुचना गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांनी दिल्या आहेत. याबाबत त्यांनी विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांना पत्र दिले आहे. दरम्यान, शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या ॲकॅडमींना अर्थपूर्ण सहकार्य करणाऱ्या या शाळांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामतीत गेल्या काही वर्षात बेकायदेशीर ॲकॅडमींनी मोठमोठ्या जाहिराती करुन पालकांची पिळवणुक चालवली आहे. मनमानी पद्धतीने फी आकारुन या ॲकॅडमींनी शिक्षणाचा धंदाच चालवला आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी वेळोवेळी आंदोलन, उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या.
बारामतीत चालणाऱ्या ॲकॅडमींकडून बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखवले जात असल्याची बाब मोहसीन पठाण यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांनी या शाळांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना पत्र दिले असून चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.
ॲकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शाळांमध्ये घेण्यात आले आहेत. हे सर्व विद्यार्थी ॲकॅडमीत शिकतात, मात्र त्यांचे प्रवेश विविध शाळांमध्ये दाखवले जातात. वास्तविक कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती महत्वाची असते. मात्र या शाळा आर्थिक हितासाठी शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही उपस्थिती दाखवतात. तसेच या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत परिक्षेत बसवले जाते.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे या शाळांच्या अनेक भानगडी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ॲकॅडमींशी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड केली जात असल्यामुळे संबंधित संस्थाचालक सर्रास बोगस प्रवेश करण्यावर भर देतात. त्यामुळे या संस्थांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे.