
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सस्तेवाडी रहिवाशी तथा वाशिम येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सलीम सय्यद हिची मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समरीनने हे यश मिळवले आहे. बारामती तालुक्यातल्या सस्तेवाडीसारख्या गावातील समरीनने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समरीन सय्यद ही सध्या वाशिम येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर कार्यरत आहे. तिने नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समरीनची मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली आहे. समरीनच्या या यशानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समरीन ही बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात झाले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला. स्पर्धा परीक्षेतून तिला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संधी मिळाली.
गेल्या पाच वर्षांपासून समरीन ही वाशिम येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या दरम्यान तिचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरूच होता. त्यातूनच तिने मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आईवडिलांसह कुटुंबियांची साथ, विविध तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवता आल्याचं समरीनने सांगितले.
समरीनची धाकटी बहीण सादिया सय्यद ही बारामतीतील पहिली आयर्न वुमन आणि भारतातील पहिली मुस्लिम युवती आहे. तसेच तिने शिवजयंतीनिमित्त मुंबई ते पुणे हे १६१ किमी अंतर धावत पूर्ण करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन केले होते. एकूणच सय्यद कुटुंबाने वेगळेपण जपले असून आता समरीनने मिळवलेल्या यशामुळे त्यात आणखी भर पडली आहे.