
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी संभाजी होळकर यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी जय पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारला अजितदादांनी पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता नव्याने निवडी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिलाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील निवडी जाहीर करण्यात आले. तसेच नियुक्ती पत्रही देण्यात आले.
या मेळाव्यात बारामती तालुका अध्यक्षपदी संभाजी होळकर यांची आणि शहराध्यक्षपदी जय पाटील यांची निवड करण्यात आली. संभाजी होळकर यांना तालुकाध्यक्षपदी चौथ्यांदा संधी मिळाली आहे. तर जय पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी बारामती तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.