
बारामती : प्रतिनिधी
अवैध दारू धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या दौंड आणि बारामती येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना काठी व दगडाने मारहाण झाल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. विशेष म्हणजे, या मारहाणीत वाहनांची तोडफोड झाल्याचेही समोर आले आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता माळेगाव येथे ही घटना घडली.
या प्रकरणी किशोर जनार्धन धनगर, पिंटु गव्हाणे (रा. विक्रमनगर माळेगाव, ता. बारामती) आणि अज्ञात ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बारामती आणि दौंड तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह अवैध दारू धंद्यांवर कारवाईसाठी गेले होते. या दरम्यान माळेगाव येथे गेल्यानंतर जमलेल्या जमावाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना काठी व दगडाने बेदम मारहाण केली.
या घटनेदरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. तर या मारहाणीच्या घटनेत फिर्यादी विजय रोकडे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दौंड येथील दुय्यम निरीक्षक गणेश बाबुराव नागरगोजे, सुभाष लक्ष्मण मांजरे, प्रविण रामचंद्र सुर्यवंशी, अशोक काशीनाथ पाटील, सागर रामचंद्र सोनवले हे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत विजय वसंतराव रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर धनगर, पिंटू गव्हाणे आणि अन्य आठ ते दहा जणांवर सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियमानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे हे करीत आहेत.