
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील कसबा येथील फलटण चौकात असणाऱ्या हॉटेल दुर्वाज येथे राडा करत हॉटेल चालकाला तलवारीने मारहाण करणाऱ्या टोळीच्या बारामती शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील म्होरक्या आदेश कुचेकर याला मुंबईतून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि ११ नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळी सराईत गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव यांनी कसबा येथील फलटण चौकात असलेल्या हॉटेल दुर्वाजमध्ये जाऊन तोडफोड केली. तसेच हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ऋषिकेश चंदनशिवे व तेजस बच्छाव यांना अटक केली होती. दहशत निर्माण करून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.
या घटनेनंतर या टोळीचा म्होरक्या आदेश कुचेकर हा मुंबईला निघून गेला होता. तो त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकारानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल आशा विविध कलमांतर्गत या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई जामदार व राणे यांनी ही कारवाई केली.