
बारामती : प्रतिनिधी
बारामती एमआयडीसी परिसरातील सूर्यनगरीमध्ये एका काटेरी झुडुपात बुधवारी सायंकाळी एका बाळाचं मुंडकं आढळून आलं होतं. हा खूनाचाच प्रकार असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले असून या प्रकरणी आता बारामती तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा असून पोलिस याचा कसून तपास करत आहेत.
बारामती एमआयडीसी परिसरातील सूर्यनगरीमध्ये बुधवारी सायंकाळी एका लहान बाळाचं मुंडकं आढळून आलं. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हे मुंडके ताब्यात घेतले होते. त्यानंतर रुई येथील ग्रामीण रुग्णालयात हे मुंडके तपासणीसाठी नेण्यात आले होते. गळ्यापासून या बाळाचे शीर वेगळे करण्यात आले आहे. उर्वरीत धडाचा भाग शोधण्याचे काम पोलिसांकडून सध्या सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात हा खूनाचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अतिशय निर्दयीपणे हे कृत्य करण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या बाळाच्या आई-वडिलांसह आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली असून या घटनेचं गूढ उकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बारामतीत पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेनंतर खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.