बारामती : प्रतिनिधी
बारामती-वालचंदनगर रस्त्यावरील सोनगाव हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर १२ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर हायवाचा चालक फरार झाला आहे. दुसरीकडे या घटनेप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
सतीश रामदास पवार (वय ३८) आणि आर्यन सतीश पवार (वय १२) अशी या घटनेत मृत पावलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. हे दोघेही सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसू गावचे रहिवासी होते. आज सकाळी हे दोघेही दुचाकीवरून जात असताना डी. पी. जगताप अँड कंपनीच्या मालकीच्या हायवा (क्र. एमएच ४२ एक्यु ८२५५) ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये सतीश पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा आर्यन हा गंभीर जखमी झाला होता.
आर्यनला बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बारामती-वालचंदनगर रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यातूनच आपघातांच्या छोट्यामोठ्या घटना घडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. आजच्या अपघातप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.