बारामती : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ३४११ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच सोमेश्वर कारखान्याकडून ३३५० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे माळेगाव कारखाना किती दर देणार याकडे लक्ष लागले होते. माळेगाव कारखान्याने ३४११ रुपये दर जाहीर करत राज्यातील विक्रमी दर जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कारखान्याच्या आर्थिक ताळेबंदावर चर्चा करून प्रतिटन ३४११ रुपये अंतिम दर ठरवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत अधिकाधिक दर देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संचालक मंडळ बैठकीत प्रतिटन ३४११ रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याने मागील काही दिवसांपूर्वी ३३५० रुपये अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऊसदराचे विक्रम मोडीत काढणारा माळेगाव कारखाना किती दर देणार याकडे लक्ष लागले होते. माळेगाव कारखान्याने सोमेश्वर कारखान्यापेक्षा ६१ रुपये प्रतिटन जादा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गेटकेन ऊसाला ३१०१ रुपये प्रतिटनानुसार रक्कम अदा केली जाणार आहे.
अजितदादांनी शब्द खरा केला
बारामती नागरी सत्कारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखाना राज्यातील विक्रमी दर देईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज प्रतिटन ३४११ रुपये दर जाहीर करत अजितदादांनी आपला शब्द खरा केल्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे संचालक योगेश जगताप यांनी सांगितले. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वात माळेगाव कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून प्रगतीची घोडदौड कायम ठेवेल. त्याचबरोबर सभासदांना राज्यात उच्चांकी दर देण्याची परांपराही कायम राखली जाईल, असाही विश्वास योगेश जगताप यांनी व्यक्त केला.