बीड : प्रतिनिधी
मागील काही वर्षात उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्याची ओरड आहे.. दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत असतानाच बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बेरोजगारीला कंटाळलेल्या एका ३४ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील काळेगावघाट येथे घडली आहे.
दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे मृत युवकाचे नाव आहे. दयानंद हा आपल्या कुटुंबियांसह काळेगावघाट येथे वास्तव्यास होता. त्याने डीएडचं शिक्षण पूर्ण केले होते. गेल्या काही वर्षांपासून तो नोकरीच्या शोधात होता. आज ना उद्या आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळेल या अपेक्षेने तो सातत्याने प्रयत्न करत होता.
नोकरीसाठी प्रयत्न करूनही संधी मिळत नसल्याने तो मानसिक तणावात होता. त्यातूनच सोमवारी दुपारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्याने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केज ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. डीएड अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना मिळेल ते काम करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.