
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद अजूनही संपलेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती जास्त चिघळत चालली आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या ४८ तासात परिस्थिती सुधारली नाही तर मी आणि माझ्या पक्षातील सहकारी बेळगावला जाऊ, असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, कर्नाटकमधील हल्ले २४ तासाच्या आतमध्ये थांबले नाही तर संयमाला वेगळा रस्ता पाहण्याची परिस्थिती निर्माण होईल. याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारची असेल. कुणीही कायदा हातात घेऊ नये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या खासदारांना सांगावे जर कोणी कायदा हातात घेतला तर याची सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे असेल, असे शरद पवार म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जाणीवपूर्वक विधाने येत आहेत. मी देखील महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आंदोलने केली आहेत. मी देखील लाठीचार्जला सामोरे गेलेलो आहे. बेळगावची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे पत्र मला येत आहे. मराठी माणसांमध्ये सातत्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचे काम चालू आहे, असे पत्र मला महाराष्ट्र एकीकरण समितीचे आलेले आहे.
महाराष्ट्राची भूमिका ही अतिशय संयमाची आहे. जर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चितावणीखोर वक्तव्य सुरू राहिले आणि गाड्यांवर हल्ले सुरूच राहिले तर देशाच्या एकतेला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीतीही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.