आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

BIG BREAKING : भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल; देवस्थान जमीन प्रकरण भोवलं..!

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी  

आठ देवस्थानांच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश धस यांच्यासह पाच जणांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस, बंधू देवीदास रामचंद्र धस, मनोज रत्नपारखी आणि अस्लम नवाब खान यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम १३ (१) (अ) (ब), १३ (२), भादंवि कलम ४६५, ४६८,४७१, १२० ब व १०९ नुसार आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदार रामनाथ खाडे यांचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरण्याचे निर्देश देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र यावर सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा सुरेश धस यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

काय आहे प्रकरण..?  

सुरेश धस यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनींसह हिंदू देवस्थानच्या जमिनीही बेकायदेशीर हस्तांतरीत केल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खाडे यांनी समोर आणली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात आला होता. एसआयटीच्या अहवालानंतर संबंधितांवर फौजदारी कारवाई न झाल्यामुळे खाडे यांनी औरंगाबाद खंडापीठात धाव घेतली.

औरंगाबाद खंडपीठाने आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर, पांढरी, खडकत येथील विठोबा देवस्थान, बेलगाव येथील खंडोबा देवस्थान, आष्टी, चिखली व चिंचपुर येथील श्रीरामचंद्र देवस्थान आणि आष्टीतील पिंपळेश्वर देवस्थान या देवस्थानांच्या जमीन हस्तांतर प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आमदार सुरेश धस यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us