दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार चालू होते.
मुलायम सिंह यादव हे गेल्या काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होते. त्यामुळे तीन महिन्यापूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. २ ऑक्टोबर पासून त्यांची प्रकृती अधिकच ढासळली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली.
मुलायम सिंह यादव हे ५५ वर्षापेक्षा अधिक काळ राजकारणात सक्रिय होते. १९६७मध्ये पहिल्यांदा ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते आठ वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले, तर सात वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
मुलायम सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक पदे भूषवली. १९९२ मध्ये समाजवादी पार्टी नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. १९९६ मध्ये ते देशाचे संरक्षण मंत्री होते. तसेच ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत.