औरंगाबाद : प्रतिनिधी
शेतीच्या वादातून प्रतिवाद्यांकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिसांनी १२ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
शेषराव सोमाजी खुटेकर (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खुटेकर यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानांची चिठ्ठी लिहीत त्यांना होत असलेल्या मानसिक त्रासाची कहाणी मांडली. या प्रकरणी त्यांचा मुलगा अरुण शेषराव खुटेकर यांनी फिर्याद दिली आहे. शेषराव यांची गेवराई बार्शी येथे साडेपाच एकर शेती आहे. ते या शेतीची देखभाल करत होते. या शेतजमिनीवरून भावकीतील लोकांसोबत मागील आठ महिन्यांपासून पैठण न्यायालय व तहसील कार्यालयात वाद प्रलंबित आहे. यावरूनच भाऊसाहेब खुटेकर, बन्सी खुटेकर, मच्छिंद्र खुटेकर, मनोज खुटेकर, अशोक खुटेकर, दीपक खुटेकर, विकास खुटेकर, रवींद्र खुटेकर, मीनाबाई खुटेकर, अर्चना खुटेकर, राणी खुटेकर, सिंधुबाई खुटेकर (सर्व रा. गेवराई बार्शी) हे सातत्याने शेषराव यांना मानसिक त्रास देत होते.
दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी आरोपींनी शेतात अनधिकृतपणे घुसून शेषराव यांना मारहाण केली होती. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी सर्वांनी शेतात जेसीबीसह ट्रॅक्टर आणून खोदकाम करत अतिक्रमण केले. त्यामुळे सततच्या जाचास आणि मानसिक छळाला कंटाळून बुधवारी सकाळी राहत्या घरी शेषराव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.