दिल्ली : प्रतिनिधी
केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील सरकारला कोणताही धोका नाही. सरकार चांगले चालले आहे. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार येईल असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल भाष्य केले. तसेच या भेटीत राज्यातील राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या प्रलंबित १२ आमदारांचा विषय आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने केलेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करते त्यावेळी त्याची जबाबदारी पंतप्रधानांची असते त्यामुळे हा विषय त्यांच्या कानावर घातल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. कोण काय बोलतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणाच्या बोलण्यावरून भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील तिन्ही पक्षाने केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात पाऊले उचलली आहेत आणि उचलत राहणार आहोत असेही शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले. सध्या राज्यातील मंत्रीमंडळात कोणताही बदल करण्यात येणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले.
युपीए अध्यक्ष पद आम्ही मागितलेले नाही. हे पद घ्यायला मी तयार नाही हे कितीतरी वेळा सांगितले आहे असेही शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तमरीत्या सुरु असून सध्या या सरकारला कोणताही धोका नाही. तसेच आगामी निवडणुकांमध्येही हेच सरकार सत्तेत येईल असेही सांगायला ते विसरले नाहीत.