बारामती : प्रतिनिधी
मी गेली ३० वर्ष बारामतीच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला याचा मोबदला म्हणून वृक्षारोपण करा. माझ्यावर खरंच तुम्हा लोकांचं प्रेम असेल तर येत्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन ते व्यक्त करा असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे भगिनी मंडळ आणि वन विभागाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह भगिनी मंडळाच्या सदस्या, पदाधिकारी उपस्थित होते.
भगिनी मंडळाने देशी झाडांची लागवड करण्याचा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. बारामती मागील काही काळात मोठ्या प्रमाणात बदलली आहे. मात्र आपण वृक्षारोपणाला महत्व दिल्याचे चांगले परिणाम पहायला मिळत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
मी गेली तीस वर्षे बारामतीच्या विकासासाठी प्रयत्न करतो आहे. याच्या मोबदल्यात आता सर्वांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावं असे आवाहन करुन अजित पवार म्हणाले, तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करत असाल तर येणाऱ्या काळात अधिकाधिक वृक्षारोपणावर भर देवून ते व्यक्त करा. त्यातून हरीत बारामती निर्माण होईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.