
मुळशी : प्रतिनिधी
मुळशी तालुक्यात फिरताना महिलांची संख्या लक्षणीय आहे. मुळशीच्या डोंगरदऱ्यातून आणि खेडोपाड्यातून आलेल्या महिला एकजुटीचा मुळशी पॅटर्न हाच विकासाचा पॅटर्न निर्माण करेल, असा विश्वास बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. विकासाच्या या प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ग्वाहीदेखील सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुळशी तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्ते, महिला व नागरिकांशी संवाद साधला. या दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला, बालकल्याण विभाग व बारामती टेक्सस्टाईल पार्कच्या वतीने महिला स्वयंसहायता गटाच्या वतीने आयोजित कार्यशाळेलाही त्या उपस्थित राहिल्या. या कार्यशाळेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी स्वत: शेती करत असल्याचं सांगत आपले अनेक अनुभव विषद केले. काटेवाडी गावातून कामाची सुरुवात करून गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिल्याचं सांगून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी टेक्सटाईल पार्कची उभारणी कशी झाली याबद्दलही उपस्थित महिलांना माहिती दिली. अजितदादांनी महिलांसाठी अर्थसंकल्पात ३ हजार १०७ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्यात उपस्थित शासकीय अधिकार्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. तर चांडाळ चौकडीच्या करामतीफेम प्रसिद्ध अभिनेते रामभाऊ जगताप यांनी मनोरंजनातून प्रबोधन केले. या मेळाव्याला मुळशी तालुक्यातील विविध भागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेत सहभाग घेतला.