नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज दिवसभर पुण्यासह दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी तासभर चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत विविध विषयांवर तब्बल पाऊण तास चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीतील फूटीनंतर आज संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील बाणेर येथील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमानिमित्त सर्व कुटुंबीय एकत्र आले. गेल्या १५ दिवसांपासून डेंग्युमुळे आजारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील कौटुंबिक कार्यक्रमानंतर अजितदादा पुण्यातील विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास या सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर अजितदादांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी काही वकील व नेत्यांशी चर्चा केल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.