मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याच स्थापन झालेल्या नविन सरकारचा विस्तार केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून खात्यांबाबत शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा रंगली होती. मात्र सरकार स्थापन झाल्यावर काही चित्र वेगळंच पहायला मिळालं. शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कोट्यात कपात होऊ शकते. भाजपला २५ तर शिंदे गटाला १३ ते १४ मंत्रीपदे मिळतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ३८ मंत्री असण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्या व्यतिरिक्त बहुतांश मंत्री नविन असतील. नव्या चेहऱ्यांना यावेळी पुढे आणले जाईल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची चाचपणी केली जाईल असेही बोलले जात आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटाला नगरविकास, एमएसआरडीसी ही खाती, तर भाजपकडे अर्थ, महसूल व गृह खाते जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहखाते आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समजते. शिंदे गटाला ३ आमदारांमागे एक मंत्रीपद, तर भाजपला ४ आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार आहे. ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार आहे.