मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर हा विस्तार होईल असं सांगितलं जात आहे. या विस्तारात राष्ट्रवादीला नव्याने एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे केंद्रातही राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे.
२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी अजितदादांसह जवळपास नऊ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. नुकतेच पालकमंत्रीपदांचेही वाटप करण्यात आले असून त्यातही अजितदादांनी बाजी मारत आपल्याला हवे ते जिल्हे मिळवले. अशातच आता राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसला एका कॅबिनेटसह तीन राज्यमंत्रीपदे मिळतील अशी चर्चा आहे. दुसरीकडे केंद्राच्या मंत्रीमंडळ विस्तारातही राष्ट्रवादीला स्थान मिळेल असं सांगण्यात येत आहे. आता या पदांवर कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे.