
नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांनी सभागृहात हजेरी लावली. सभागृहात ते कोणत्या बाजूला बसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यानुसार आज त्यांनी सत्ताधारी बाकावर बसत अप्रत्यक्षपणे अजितदादांच्या गटासोबत असल्याचे दाखवून दिले आहे.
मनी लॉन्डरिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. आज नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनातही नवाब मलिक यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते कोणाला पाठिंबा देतात याचीच चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी अजितदादा गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयातही हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी सभागृहात सत्ताधारी बाकावर बसत अप्रत्यक्षपणे अजितदादांच्या गटात असल्याचं दाखवून दिलं.
दरम्यान, अधिवेशनाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक हे निर्णय घेण्यास समर्थ असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्याशी आपण दूरध्वनीवरून बोललो आणि त्यांचं अधिवेशनासाठी स्वागत केल्याचंही अजितदादांनी सांगितलं होतं. त्यानंतर सभागृहात हजर झालेले नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होऊ लागली आहे.