बारामती : प्रतिनिधी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्रमुख पदाढीकाऱ्यांसमवेत आज बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची सहयोग या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तब्बल पाऊण तास झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवा नेते जय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राजेश पांडे, संदीप खर्डेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीसाठी निवडक पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या व्यूहरचनेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या समन्वयाबाबतही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी महायुतीचा उमेदवारच १००० टक्क्यांनी निवडून येणार असं निक्षून सांगितलं. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाऊण तास चर्चा केली. त्यामुळे महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचनेला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.