
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार हे मागील काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या बारामतीतील नागरी सत्कारानंतर आज पार्थ पवार यांनी बारामती शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी विविध मंडळांच्या आरतीतही पार्थ पवार सहभागी झाले.. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला.
पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय होत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर पार्थ पवार हे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी सत्कारावेळीही त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी आज बारामती शहरात सदिच्छा भेटी घेतल्या.
आज सकाळीच पार्थ पवार यांनी बारामती शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटींना सुरुवात केली. शहरातील विविध मंडळांना भेटी देत त्यांनी गणरायाची आरतीही केली. या दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत विचारपूस केली. तसेच विविध मंडळांची माहितीही त्यांनी घेतली. वेगवेगळ्या भागात फिरताना कार्यकर्त्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. एकूणच पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय होत असल्याच्या चर्चा असताना त्यांनी बारामतीत गणेश मंडळांना दिलेल्या भेटीही लक्ष वेधणाऱ्या ठरल्या आहेत.