Site icon Aapli Baramati News

CRIME NEWS : पुणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; १७३ गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा भांडाफोड, सोने, चांदीसह १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ११ गुन्हेगारांचा समावेश असलेल्या या टोळीकडून १७३ गुन्ह्यांची उकल करत जवळपास १ कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आजवरच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असून पुणे शहर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

अजयसिंह अर्जुनसिंह दुधानी (२३,रा. मांजरी), बच्चनसिंह जोगींदरसिंग भोंड (२५, वैदवाडी), रामजितसिंह रणजिंतसिंह टाक, कणवरसिंह काळुसिंह टाक, संतोष शिवाजी पारगे (४५,रा. हडपसर), गोपीनाथ जालींदर बोराडे (२९), रोहीतसिंह सुरेंद्रसिंह जुनी (२२), आरती मंगलसिंह टाक (३२), कविता मनुसिंह टाक (३०) यांच्यासह इतर आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १७३ गुन्हे उघड करत सव्वा किलो सोने, १ किलो चांदी, ३ पिस्तूल, १४ जिवंत काडतूसे असा जवळपास १ कोटी २२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत माहिती अशी की, हडपसर भागातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेले आरोपी फुरसुंगी परिसरात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यामध्ये सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्यामुळे पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. त्यानुसार आरोपींचा ठावठिकाणा शोधत पोलिस फुरसुंगीत दाखल झाले. आरोपी उसाच्या शेतात लपून बसले होते. मात्र त्यांच्याकडे हत्यारे असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण उसाला घेराव घातला.

त्या ठिकाणी दुधानी आणि भोंड या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झाडाझडती घेतल्यानंतर ३ पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे, मोबाईल, कटावणी, कोयता अशी हत्यारे मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिलकसिंह, रामजितसिंह, करणसिंह, अक्षयसिंह तसेच कणवरसिंह यांच्या मदतीने शहर परिसरात गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यावरून पोलिसांनी रामजितसिंह, कणवरसिंह यांना ताब्यात घेतले. पोलिस तपासात आरोपींनी पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील विविध भागात घरफोडी केल्याचे कबूल केले.

या आरोपींकडून पोलिसांनी ८० लाख १५ हजारांचे दागिने, ७८ हजारांची चांदी, वाहने आणि इतर असा तब्बल १ कोटी २२ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अटक केलेले सर्वच आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. जवळपास १७३ गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट, खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे अशोक इंदलकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख, अंमलदार संतोष क्षीरसागर, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, निखील जाधव, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version