Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : जेजूरीत खंडोबाचं दर्शन घ्यायचे अन जेजूरी-सासवड परिसरात घरफोड्या करायचे; पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने केला टोळीचा पर्दाफाश

ह्याचा प्रसार करा

जेजूरी : प्रतिनिधी

जेजूरीत खंडोबाच्या दर्शनाला येऊन सासवड आणि जेजूरी परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

राहुल हिरामण लष्करे (वय २२ रा. काळा खडक, वाकड, ता. हवेली) आणि अजय एकनाथ चव्हाण (वय २२ रा. जांभळी बु. ता. भोर, मूळ रा. गेवराई जि बीड) या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, मागील काही दिवसात जेजूरी, सासवड परिसरात घरफोडीसह चोऱ्यांचे प्रकार घडले होते. दुपारच्या वेळी बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरी केल्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती.

दरम्यानच्या काळात, संबंधित गुन्हे राहुल लष्करे याने केल्याची आणि तो नसरापूर फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा लावून राहुल लष्करे आणि त्याचा साथीदार अजय चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी जेजूरीत खंडोबाच्या दर्शनासाठी आल्यानंतर वाल्हे आणि सासवड परिसरात बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राहुल लष्करे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर हद्दीत पाच गुन्हे दाखल आहेत. नवनवीन साथीदारांना सोबत घेऊन राहुल लष्करे हा वेगवेगळे गुन्हे करत होता अशीही माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचाही शोध पोलिस घेत आहेत.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, राजू मोमीन, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत, प्राण येवले यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जेजूरी पोलिस करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version