
पुणे : प्रतिनिधी
अलीकडील काळात बनावट कागदपत्रे सादर करून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिस भरतीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळवल्याचे भासवणाऱ्या या उमेदवारांचा पर्दाफाश झाला आहे. त्यावरून दहा उमेदवारांवर पुणे शहरातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपअधीक्षक युवराज मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमिनाथ सुधाकर कंठाळे (बीड), अजय बब्रुवान जरक (सोलापूर), अक्षय बाळासाहेब बडदे (पुणे), दिनेश अर्जुन कांबळे (बीड), राजेश रमेश धुळे (पुणे), अमोल विठ्ठल गरके (नांदेड), ध्रुपद प्रल्हाद खराडे (नांदेड), गोविंद भक्तराज मिटके (नांदेड), आसाराम बाळासाहेब चौरे ( बीड) आणि हेमंत विठ्ठल निकम (पुणे) या दहा उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, २०२१ मध्ये राज्य शासनाने पोलिस शिपाई भरती जाहीर केली होती. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून २०२३ मध्ये ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये वरील दहा उमेदवारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केले. शासन प्रक्रियेनुसार ही प्रमाणपत्रे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली. त्यात बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारची प्रमाणपत्रे दिलेली नसल्याचं कळवण्यात आलं.
विशेष म्हणजे या उमेदवारांनी २००९ ते २०१५ या कालावधीत ही प्रमाणपत्रे तयार केली होती. ही सर्व बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे पोलिस भरतीसाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी दिली.