पुणे : प्रतिनिधी
येणाऱ्या काळात होत असलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आज माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यावर पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज जगताप यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रशांत जगताप यांची पुणे शहाराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले. हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या काळात होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांची निवड करण्यात आली आहे. प्रशांत जगताप यांनी महापौर, पीएमपीएल संचालक अशी अनेक पदे भूषवत यशस्वीरीत्या काम केले आहे. २१ वर्षांपासून ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करीत आहेत.
प्रशांत जगताप यांनी महापौरपदावर असताना अतिशय कार्यक्षमपणे आणि सक्षमपणे काम केले आहे. त्यांचा अनुभव पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रशांत जगताप यांना शुभेच्छा देत आगामी काळात उल्लेखनीय कामकाज होईल असा विश्वास व्यक्त केला.