मुंबई : प्रतिनिधी
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. जगात तिसरी लाट आल्याचे तज्ञांचे मत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यात आता लवकरच ओमीक्रॉनवर लस येणार असल्याचे फायझरने स्पष्ट केले आहे.
फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांनी एका मुलाखतीत बोलताना ही माहिती दिली. येत्या मार्चमध्ये लस उपलब्ध होईल. या लसीचा वापर होईल की नाही ते आता सांगू शकत नाही. पण तरीही आम्ही लस तयार करत आहोत. तसेच या लसीचे दोन डोस आणि बुस्टर डोस ओमीक्रॉनमुळे होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण मिळवून देईल, असे बोएर्ला यांनी सांगितले.
दुसरीकडे माॅडर्ना कंपनीकडूनही ओमीक्रॉनसाठी लस विकसित केली जात आहे. ही लस २०२२ पर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती माॅडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बन्सल यांनी दिली आहे. एकूणच संपूर्ण जगभरात कोरोना आणि ओमीक्रॉनचा धोका वाढल्यानंतर तत्परतेने लस बनवण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.