आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

आपली परंपरा, आपला अभिमान; शिखर शिंगणापूरची यात्रा आणि कावड…!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

गुढीपाडवा झाला की वेध लागते ते शिंगणापूर च्या यात्रेचे. शाळा कॉलेजांच्या परीक्षा संपून सुट्ट्या लागलेल्या असतात, शेतकरी वर्गाची ही कामं सुगी झाल्यामुळे बऱ्यापैकी आवरलेली असतात. गुढीपाडव्याच्या दिवशीच कावड उभी करून गावातल्या शंभू महादेवाच्या मंदिराला भेट देवून आणली जाते. एकादशीच्या एक, दोन किंवा तीन दिवस आधी गावापासून शिंगणापूर च्या अंतरावर अवलंबून कावडी, काठ्या गावातून निघतात.

शंभू महादेव आपल्या पत्नी पार्वती वर रुसून बसलेले असतात, पार्वती देवी ज्या डोंगराच्या ठिकाणी त्यांना शोधून काढतात आणि दुसऱ्यांदा लग्न करतात ते ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर असं जेष्ठ लोकांच्या गोष्टींमधून सांगितले जातं. शिंगणापूर ला दक्षिण कैलास असेही म्हणतात. शहाजीराजे, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचेही श्रद्धास्थान म्हणून शिंगणापूर ओळखले जाते.  आज छत्रपती भोसले घराण्याचे हे खाजगी देवस्थान आहे.

कावड म्हणजे उभी पताका, त्यावरती बांधलेले डौलात हलणारे वनगायीचे केस, खांदा देण्यासाठी मागे आणि पुढे खांदे, खांद्याच्या मधील जोडणीला बसवलेले पाण्याने भरलेलं दोन तांब्याचे, पितळेचे कलश (रांजण) , नंदीची लहानशी मूर्ती आणि उभा करण्यासाठी चार समांतर पाय. तर काठ्या म्हणजे फक्त मोठी काठी आणि बांधलेली पताका ती एक माणूस डोक्यावर उचलून घेऊ शकतो. तर कावडींच्या आकारानुसार खांद्याला दोन किंवा चार लोकं लागतात दोराला दोघे चौघे सोबतच असतात. वेगवेगळ्या गावांच्या कावडीचा आकार आणि त्यांची बांधणी वेगवेगळी असते.

तरुणांचा सहभाग या पायी वारी मध्ये लक्षणीय असतो, चालत असताना पुढचे टप्पे आणि खांदेकरी ठरलेले असतात, ठरलेल्या वेळेपर्यंत पुढच्या गावात कावड खांद्यावर घेऊन पोहचवली जाते. वाटेतील गावांमध्ये या चालणाऱ्यांसाठी गावकरी स्वइच्छेने अन्नदान करतात. शेतामध्ये असणाऱ्या काकड्या, कलिंगडे, खरबूज, लिंबूसरबत ही वाटप करत असतात. निंबळक च्या कॅनॉल वर तासभर पोरं पोहतात आणि तिथून मग बरड वरून पुढे जात विसाव्याची (ठिकाणचे नावच विसावा आहे) वाट पाहत डोळे आतुरलेले असतात.

बरड ते विसावा अंतर लवकर तुटत नाही तिथं तुमच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो, उन्हाची तीव्रता कमी झालेली असते पण चालून चालून शरीर थकलेले असतं.  विसाव्यावर आल्यानंतर कावडीची आरती होते. एकावर एक पाच सात छोटी चपटी दगडी मांडून लोक विसाव्याची खूण मांडतात. त्यानंतर कावड मुक्कामाच्या ठिकाणी पोहचते.  दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ नाश्ता करून कावडी कोथाळे गावात महादेव मंदिरापाशी येतात आणि तिथं कावडी हलगी आणि डफड्याच्या तालावर नाचवल्या जातात, तरूण मोठ्या उत्साहाने त्या लयबद्ध तालावर नाचत असतात, वेगवेगळ्या गावांच्या कावड्यांची आणि वादकांची जणू नाचण्याची स्पर्धाच तिथं होत असते. कोथळे गावात गुलालाची उधळण करून कावड मुंगी घाटाच्या पायथ्याला येऊन विसावते.

मुंगी घाट म्हणजे खालून पहिलं तर वर जाणारी माणसं ही मुंगी सारखी लहान आणि रांगांनी चाललेली दिसतात म्हणून त्याला मुंगी घाट बोलतात असं जेष्ठ लोकांकडून सांगितलं जातं. घाट चढायच्या आधी थोडावेळ सगळे विसावा घेतात. तोंडाला कोरड पडू नये म्हणून आपल्या कावडी सोबतच्या लोकांना तोंडात ठेवायला लिंबू आणि लेमन गोळ्या दिल्या जातात. कावडीला पुढं अधिकचा मोठा दोर बांधला जातो आणि हर हर महादेव… म्हणत कावड घाट चढायला चालू करते. जवळपास अश्याच शेकडो कावडी एकाच वेळी घाट चढत असतात.

व्यवस्थापन करणारे जेष्ठ घाट चढताना कावडीला खांदेकरी हे काटक, चपळ आणि अनुभवी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, दोरीलाही अनुभवी आणि काही नवखे तरुण असा मेळ घातला जातो. “हर हर महादेव… हरहर बोला…” च्या वातावरणात संपूर्ण घाट शिवमय झालेला असतो. “म्हाद्या धाव, म्हाद्या धाव… लोकांना सांभाळ” असंही एकेरी धावा काही जेष्ठ महादेवाच्या प्रेमापोटी करत असतात त्यात त्या भक्ताच्या आणि महादेवाच्या निर्मळ नात्याचा प्रत्यय येत असतो.

शेवटच्या टप्प्यावर सरळ पंधरा ते वीस फुटाचा अखंड खडक आहे तिथं खांदेकरी आणि दोरीच्या माणसांची खरी परीक्षा असते. पुढे दोरीला तरुणांकडून खेचलं जात असतं आणि पुढच्या खांदेकऱ्याला ९० डिग्रीत खडकाला पाय देऊन चढावं लागतं त्यामुळे त्याच्या खांदा आणि पाय दोन्हीवर एकाच वेळी ताण येतो, मागच्या खांदेकऱ्याला कावडीला घट्ट धरून चपळाईने वरती यावं लागतं तर कावडीच्या पायांना धरून वर जाण्यासाठी मागच्या लोकांची तिघांची घाई चाललेली असते. हरररर बोला… म्हणत तो टप्पा पूर्ण होतो. तेलोजी भुते ही मानाची कावड तर कोणत्याही दोराचा आधार न घेता मानवी हातांच्या साखळीने सगळ्यात शेवटी चढवली जाते.

कावड घाट चढून वरती येते आणि तयारीत असणारे डफडे वाले आणि हलगी वाले वाजवायला सुरू करतात तिथं विजयाचा आनंद, महादेवाच्या भेटीची उत्सुकता नाचून साजरी केली जाते. तिथून पळतच कावड वरील देवळांना भेटी देत मुख्य महादेव मंदिरा समोर आणून पुन्हा नाचवली जाते. पाण्याचे कलश (रांजण) सोडून मंदिरामध्ये नेले जातात. आणि त्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घातला जातो, पावसासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. दोनचार दिवस चालून आलेला शीण महादेवाच्या भेटीने नाहीसा होतो.

तिथून कावडी कावडी तळाकडे प्रस्थान करतात. एक दिवस मुक्काम करून चालतच रेडे घाटाने परतीच्या वाटेला  चालू लागतात.  तर काही आपापल्या सोयीने ट्रॅक्टर मधून मानकऱ्यांच्या घरी, गावात येवून विराजमान होतात. असा हा शंभू महादेवाच्या कावडीचा सोहळा अनेक आठवणी, अनुभवांसह संपन्न होतो. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा हा पायी वारीचा सोहळा असतो जिथं जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत अशी कोणतीही भिंत न पळता ‘ शंभू महादेवाचा भक्त’ या एका शब्दाखाली माणसं माणूस म्हणून एकत्र येतात.

महादेव सर्वांचं भलं करो!

सुरज महेंद्र पिसाळ, पणदरे, ता. बारामती


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us