सांगली : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धर्माच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य करत घणाघाती टीका केली आहे. देशामध्ये धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचं काम सुरू आहे. देशासाठी हुतात्मा झालेल्यांवर टीका करणाऱ्यांचे नेतृत्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. आत्तापर्यंत माणसं जोडण्याचे काम झाले. मात्र देशाचं राजकारण वेगळ्या वळणावर जात आहे. तर राज्य सरकार वेगळ्या विचाराने काम करत असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.
देशामध्ये धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचे काम चालू आहे. जे देशासाठी हुतात्मा झाले. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे आज देशात नेतृत्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आता आपल्या सर्वांना धर्मांध शक्ती विरोधात काम करावे लागणार आहे. सध्या देशाला विकासात्मक राजकारणाची गरज आहे. त्यासाठी राजकारण देखील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे असायला हवे असे सांगतानाच शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून राज्याचा विकास होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.