आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

नीरा नदीवरील ब्रिटीश कालीन पुलाची दुरावस्था; तुटलेले संरक्षक कठडे, तर काही ठिकाणीच्या सळ्याच गायब..!

डांबरीकरण व संरक्षक कठडे दुरूस्त करण्याची मागणी

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

नीरा  : प्रतिनिधी

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीवरील जुन्या ब्रिटीश कालीन पुलावर पडलेले भले मोठे खड्डे,  संरक्षक कठडेही तुटलेले तर काही ठिकाणीच्या संरक्षक कठड्याच्या सळ्याच गायब अशी स्थिती झाली आहे. या पुलाचे डांबरीकरण व दुरूस्ती केंव्हा होणार? असुरक्षित पुलावरूनच माऊलींचा रथ नीरा स्नानाकडे मार्गस्थ होणार का ? असा सवाल भाविकांसह नागरिक उपस्थित करू लागले आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाची पालखी सोहळ्यापुर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांमधून होऊ लागली  आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यासाठी पालखी सोहळा पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीवरील ज्या जुन्या ब्रिटीश कालीन पुलावरून मार्गस्थ होतो, तो पुल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून पायी वारी रद्द करण्यात आली होती. परंतू यंदा कोरोनाचा संसर्ग अत्यंत कमी झाल्यामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्यात दुप्पटीने वारकरी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

माऊलींच्या ‘नीरा स्नाना’ला पालखी सोहळ्यात विशेष महत्व आहे. माऊलींच्या पादुकांना पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीवरील प्रसिद्ध दत्तघाटावर नीरा नदीच्या पविञ तीर्थांनी शाही स्नान घालण्यात येते. हे स्नान पाहण्यासाठी नीरा नदीच्या नविन  व जुन्या ब्रिटीशकालीन पुलावर वारकऱ्यांसह हजारो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे जुन्या ब्रिटीश कालीन पुलाचे कठडे तुटल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रथापुढे व रथामागे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा पुल असुक्षित झाला आहे.

दरम्यान,नीरा नदीवरील जुन्या ब्रिटीश कालीन पुलाचे डांबरीकरण आणि संरक्षक कठड्यांची दुरूस्ती पालखी सोहळा येण्यापुर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने करावे अशी मागणी आळंदी संस्थानचे विश्वस्त,  भाविक आणि नागरिकांमधून होत आहे.

नियोजन बैठकीत प्रश्न उपस्थित करणार

नीरा नदीवरील ब्रिटीश कालीन पुलाची आम्ही शनिवारी ( दि.२१) पाहणी केली. तेंव्हा या पुलाचे डांबरीकरण तसेच  संरक्षक कठड्याच्या दुरूस्तीच्या कामाबाबत प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केल्याचे दिसून आलेले नाही. यापुढील पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत या पुलाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us