सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत महाविद्यालयाच्या दुसऱ्या माजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. मंगळवारी ही घटना घडली असून गंभीर जखमी विद्यार्थीनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
साक्षी रवींद्र जाधव (वय १७) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, साक्षी ही कुपवाड येथील झील इंटरनॅशनल स्कूल व कॉलेज या संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. काल सायंकाळी ५ वाजता ती घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिचे आई-वडीलही महाविद्यालयात आलेले होते. त्यांना पाहून तिने आपली स्कूल बॅग स्कूल बसमध्ये ठेवून पुन्हा महाविद्यालयाकडे धाव घेतली.
महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जात तिनं जवळपास ४० ते ४५ फुट उंचीवरुन खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. शाळा प्रशासन आणि तिच्या पालकांनी तिला जवळच असलेल्या रुग्णालयात नेले. परंतु तिची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.
तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या विद्यार्थिनीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कारण समोर आलेले नाही. पोलिस या अनुषंगाने तपास करीत आहेत.