
कोल्हापूर : प्रतिनिधी
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल होते. अखेर आज राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिक पाठीत वार करणारा कार्यकर्ता नाही. आमच्यासाठी मातोश्रीचा आदेश अंतिम असल्याचे सांगत काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव यांना विजय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, निवडणूक लागल्यावर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. करारानुसार ही जागा काँग्रेसकडे गेली आहेत. नाराज होण्याचे काहीच कारण येत नाही. मी शिवसैनिकांना समजावत होतो. मी कधीच तिकीटासाठी आग्रही नव्हतो. पक्षप्रमुखांचा आदेश महत्त्वाचा आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत १२३ जागांपैकी ७० जागेवर शिवसेनेचा पराभव झाला. त्यामध्ये मी होतो. तरीदेखील साहेबांनी मला राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष केले.
स्वाभाविकच शिवसैनिक थोडे नाराज होते. मात्र मातोश्रीचा अंतिम आदेश आहे, असे राजेश क्षीरसागर म्हणाले. काँग्रेसच्या उमेदवाराला उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ३० हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवून देऊ अशी मोठी घोषणाही त्यांनी केली. तसेच भाजपाचे नामोनिशान मिटविण्याचे ठरवले आहे. जनता दुधखुळी राहिलेली नाही. भाजप लोकांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.