बारामती : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पाचगणी आणि महाबळेश्वर या पर्यटन स्थळी रविवारी (दि.५) व्यापक स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संत निरंकारी मिशनच्या बारामती आणि सातारा झोनमधील स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती सातारा झोनचे प्रमुख नंदकुमार झांबरे यांनी दिली.
निरंकारी मिशनच्या माध्यमातून जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वी ग्रहाला भेडसावत असलेल्या पर्यावरणीय संकटाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी संत निरंकारी मिशनचे हजारो स्वयंसेवक त्यांच्या खाकी गणवेशात आणि SNCF स्वयंसेवक त्यांच्या निळ्या टी-शर्ट आणि कॅपमध्ये इतर भाविक आणि संबंधित शहरातील रहिवाशांसह स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण मोहीमेत सहभागी होणार आहेत.
महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा आणि पन्हाळा या ठिकाणी स्वयंसेवक सकाळी आठ वाजता एकत्र येतील आणि दुपारी बारा वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात येईल. संत निरंकारी मिशन २०१४ पासून संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असल्याचे श्री. झांबरे यांनी सांगितले.