सातारा : प्रतिनिधी
तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जवानाला वीरमरण आले आहे. प्रथमेश संजय पवार यांना चकमकीत काल रात्री वीरमरण आले आहे. या घटनेमुळे जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
लहानपणापासून सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न प्रथमेश पवार यांनी पाहिलं होतं. तीन महिन्यांपूर्वीच त्याला सीमा सुरक्षा दलात संधी मिळाली होती. १९ मे रोजी रात्री प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात कर्तव्यावर होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. त्यामध्ये दहशतवाद्यांच्या प्रत्युत्तर देताना प्रथमेश यांना गोळी लागली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
अवघ्या २२ व्या वर्षी प्रथमेश पवार यांस वीरमरण आले आहे. उद्या त्यांचे पार्थिव बामनोली तर्फ कुडाळ येथे आणले जाणार आहे. प्रथमेशच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. सैन्यदलात जाण्याचं स्वप्न पूर्ण होवून पुढील आयुष्य स्थिर स्थावर होण्यापूर्वीच प्रथमेशला वीरमरण आल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.