इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील एका विहिरीचं काम सुरु असताना रिंग कोसळून चार कामगार अडकल्याची घटना घडली आहे. बुधवारी दिवसभर एनडीआरएफ पथकाने या चौघांचा शोध घेतला. संध्याकाळी अंधार पडल्यामुळे हे मदतकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.
मासोबावाडी गावाजवळील एका विहिरीत रिंगिंग काँक्रिटचे काम सुरू असताना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक काँक्रिटचा काही भाग विहिरीत पडला. विहिरीच्या आजूबाजूला ढिगारा आल्याने विहिरीत काम करणारे ४ मजूर ढिगाऱ्यात गाडले गेले. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण अशी या विहिरीतील ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांची नावे आहेत.
काल एनडीआरएफच्या दोन पथकांकडून मदतकार्य राबवण्यात आलं. संध्याकाळी अंधार पडल्यामुळं हे मदतकार्य थांबवण्यात आलं होतं. आज गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा एनडीआरएफ पथकाकडून शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.
मदतकार्यातील अडथळे लक्षात घेता अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून या ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांना काढले जाणार आहे. घटनास्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.