आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

INDAPUR BREAKING : इंदापूरच्या तहसीलदारांवर ‘असा’ झाला हल्ला; घटनाक्रम सांगत तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले, ‘त्या’ लोकांनी केला हल्ला..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी    

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर आज इंदापूर शहरातील संविधान चौकात जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असतानाच या हल्ल्यातून बचावलेले तहसीलदार श्रीकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अवैध धंद्यांविरोधात आपण नेहमीच भूमिका घेतली आहे; त्यातून दुखावलेल्या व्यक्तींनी हे कृत्य केलं असावं असा संशय व्यक्त करत प्रशासनाकडून या व्यक्तींचा छडा लावून अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या जातील असं श्रीकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार श्रीकांत पाटील हे आपल्या कार्यालयाकडे जात होते. यावेळी शहरातील संविधान चौकात एका स्कार्पिओतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर श्रीकांत पाटील यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात धाव घेत घडल्या प्रकाराची माहिती दिली. इंदापूर पोलिसांनी या घटनेनंतर ठिकाठिकाणी नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या हल्ल्यातून बचावलेले तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

मी व माझा चालक शासकीय वाहनातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे कार्यालयाकडे जात होतो. त्यावेळी संविधान चौकात अचानक एक स्कार्पिओ कार आमच्या वाहनाला आडवी आली. यातील एका व्यक्तीने हातातील लोखंडी गजाने आमच्या वाहनावर हल्ला केला. हा काहीतरी गंभीर प्रकार असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही बचावात्मक पवित्रा घेतल्याचं श्रीकांत पाटील यांनी सांगितलं.

या दरम्यान, आणखी दोन ते तीन व्यक्ती त्या स्कार्पिओ कारमधून खाली आल्या. त्यांच्याही हातात लोखंडी गज, पाईप होते. त्यांनीही वाहनावर हल्ला करत आमच्या अंगावर मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, पुढे स्कार्पिओ आणि मागे वाहने असल्यामुळे आम्हाला हलता येत नव्हते. मात्र एक बस पुढे गेल्यानंतर आम्ही तातडीने तिथून निघून थेट पोलिस ठाण्यात आल्याचं नमूद करत श्रीकांत पाटील यांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला.

‘त्या’ लोकांनी हल्ला केल्याचा संशय

या हल्ल्याबाबत कोणावर संशय आहे का अशी विचारणा पत्रकारांकडून करण्यात आली. त्यावर श्रीकांत पाटील म्हणाले, मी दुसऱ्यांदा इंदापूरचा तहसीलदार म्हणून काम करत आहे. आजवर मी अवैध धंद्यांविरोधात भूमिका घेऊन हे प्रकार पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच कोणी दुखावलं असेल आणि त्यांनी हा हल्ला केला असावा, असा माझा संशय आहे. या संपूर्ण प्रकाराचा पोलिस यंत्रणेकडून छडा लावला जाईल आणि अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या जातील, असेही ते म्हणाले.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us