आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

CRIME BREAKING : म्हसोबावाडी दुर्घटनेप्रकरणी विहीरमालकासह कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; विहीर मालकाला पोलिसांनी केली अटक, कंत्राटदार फरार..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

भिगवण : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील विहीरीचं काम सुरू असताना रिंग कोसळून चार मजुरांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी विहीरीचा मालक गिरीश विजय क्षीरसागर आणि कंत्राटदार विश्वास गायकवाड या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवण पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील विहिरीच्या रिंग बांधण्याचे काम सुरु असताना मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी मातीचा ढिगारा ढासळला. त्यामध्ये जावेद अकबर मुलाणी, सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, परशुराम बन्सीलाल चव्हाण, आणि लक्ष्मण मारुती सावंत हे चार मजूर गाडले गेले होते. मंगळवारी उशीरा या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह शासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत एनडीआरएफचीही मदत मिळवली. बुधवारी सकाळीच एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. या घटनेला कोणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्यामुळे हे मजूर कोणत्या ठिकाणी होते हे शोधणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रयत्न करूनही या मजुरांना जीवंत वाचवता आले नाही.

सुमारे ७० तास चाललेल्या मदतकार्यानंतर शुक्रवारी या चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह काढल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णवाहिका अडवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचवेळी विहीर मालकासह कंत्राटदाराला तात्काळ अटक करून आमच्या ताब्यात द्या अशी भूमिका घेतली. पोलिस आणि महसूल प्रशासनाकडून नातेवाईकांची समजूत काढण्यात आली.

संबंधितांना कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. रात्री उशीरा या चारही जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील मृत मजूर इंदापूर तालुक्यातल्याच बेलवाडी गावचे रहिवासी होते. या दुर्घटनेत या निष्पाप मजुरांना जीव गमवावा लागल्यामुळे बेलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भिगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीश क्षीरसागर आणि कंत्राटदार विश्वास गायकवाड या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी काम करताना मजुरांच्या जीवाला धोका होऊ शकतो यांची कल्पना असताना कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा वापर केला नाही. त्यामुळे या मजुरांना जीव गमवावा लागल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे या विहीरीचा मालक गिरीश क्षीरसागर याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. मात्र कंत्राटदार विश्वास गायकवाड हा फरार झाला आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us