
दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील पाटस येथील एल. व्ही. डेअरी फार्मने १८ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज घेत कोटक महिंद्रा बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज घेऊन ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी दोशी कुटुंबातील तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणी महेश लक्ष्मणदास दोशी, मनाली मंगेश दोशी व मिलिंद लक्ष्मणदास दोशी ( सर्व रा. पाटस ता.दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा येथील कोटक महिंद्रा बँक शाखेचे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, दोशी कुटुंबीयांनी महिंद्रा कोटक बँकेला खोटी माहिती आणि बनावट कागदपत्रे सादर करून १८ कोटी ४६ लाख रुपये एल. व्ही. डेअरी फार्मसाठी कर्ज म्हणून घेतले होते. मात्र ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता संबंधित भागीदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.
२५ डिसेंबर २०१५ ते २७ ऑगस्ट २०२२ या काळात हे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद बँकेचे अधिकारी दुष्यंतसिंह यांनी दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे हे करीत आहेत.