आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

CRIME BREAKING : आई-मुलीतील वादाचं पर्यावसान मारहाणीत झालं; रागात आईनं गळा दाबत मुलीचा जीवच घेतला, दौंडमधील घटनेनं उडाली खळबळ

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

आई आणि मुलीमध्ये वाद होऊन त्याचं पर्यावसान मारहाणीत झालं आणि त्यातूनच रागानं पेटलेल्या आईनं चक्क पोटच्या मुलीचा गळा दाबत खून केल्याची धक्कादायक घटना दौंड शहरात घडली आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिक्षा हरिओम जागिंड (वय १८) असे या घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. तर सरिता हरीओम जागिंड या महिलेवर दौंड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीचे वडील हरीओम जागिंड (रा. डिफेन्स कॉलनी, रेल्वे वसाहत, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की,  हरिओम जागिंड हे दौंड रेल्वेमध्ये पॉइंट्स मॅन म्हणून नोकरी करत आहेत. ते आपल्या पत्नी आणि चार मुलांसह रेल्वे वसाहतीत वास्तव्यास आहेत. बुधवारी त्यांची मुलगी दीक्षा हिचा शाळेत वाद झाला होता. त्यामुळे घरी आल्यानंतर तिने सर्वांशीच अबोला धरला होता. यातूनच संध्याकाळच्या वेळी ती घराबाहेर निघत असताना तिची आई सरिता हिने तिला दारातून आतमध्ये ओढत बेडवर बसवले. त्यानंतर दिक्षाच्या पोटात जोरात लाथही मारली.

आईकडून अचानक मारहाण होऊ लागल्यामुळे दिक्षाने आईला धक्का दिला. त्यामुळे राग अनावर झालेल्या आईने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. या दोघींची भांडणे सोडवण्यासाठी लहान मुलगी विजयालक्ष्मी हिने प्रयत्न केला. मात्र तीही धक्का लागून खाली पडली. या दरम्यान, सरिताने दिक्षाच्या गळ्यावर लाथ मारत तिला बेडवर आडवे पाडून तिचा गळा दाबला. त्यानंतर दिक्षाची काहीच हालचाल झाली नाही.

दरम्यानच्या काळात दिक्षाचे वडील कामावरून परतल्यानंतर विजयालक्ष्मीने  हा संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. हरीओम यांनी दिक्षाजवळ जाऊन तिला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणतीही हालचाल करत नव्हती. ती निपचित पडल्याचे आणि तिचे शरीर थंड पडल्याचे हरीओम यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने दौंड पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आईने केलेल्या मारहाणीत दिक्षाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी दौंड पोलिसांनी आई सरिता हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वत:च्या मुलीचाच क्षुल्लक कारणावरून गळा घोटत जीव घेतल्याच्या या घटनेनंतर दौंडसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा वाद नेमका का झाला, आई इतकी निष्ठुर का बनली याचा आता दौंड पोलिस तपास करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us