
कोल्हापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांनी घेतला आहे. जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांना कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज त्यांना कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर एसटी आंदोलकांनी हल्ला केला होता. त्या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सातारा पोलिसांनीही अटक केली होती. त्यानंतर पुन्हा ऑर्थर रोड कारागृहात गेलेल्या सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांनी घेतला आहे.
जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आज या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. पोलिसांनी सदावर्ते यांच्या चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली. न्यायालयाने सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांची सध्या महाराष्ट्र वारी सुरु आहे. मुंबई, सातारा आणि आता कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेतला आहे.