सातारा : प्रतिनिधी
मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात प्रवेश करताना सदावर्ते यांनी भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या. दरम्यान, सदावर्ते यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटण तालुक्यातील कोंजवडे येथील राजेश निकम यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.
मागील काही महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यात आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ जणांना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वीच सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात प्रक्रिया केली. त्यानुसार आज सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.