
कोल्हापूर : प्रतिनिधी
लहान मुलांच्या मनात एखादी गोष्ट रूजली की ती कायम राहते असं म्हणतात. त्यामुळंच त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती दाखवणं टाळलं जातं. मात्र शाळेतून घरी जाताना सापावर पाय पडल्यामुळं घाबरलेल्या एका चिमूकल्याच्या मेंदुपर्यंत ताप जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अर्णव नवनाथ चौगुले (वय ८) असं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमूकल्याचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, करवीर तालुक्यातील वाकरे येथे वास्तव्यास असलेला अर्णव हा चार दिवसांपूर्वी शाळा सुटल्यानंतर घरी जात होता. घरी जात असताना अचानक त्याचा पाय सापावर पडला. त्यामुळं तो प्रचंड घाबरून गेला. त्यानं घरी जाताच आपल्या आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. त्याला सापाने कुठे दंश केला आहे का हे त्यांच्या कुटुंबीयांनी पाहिलं. मात्र कुठेही दंश किंवा ओरखडा दिसून आला नाही. त्यामुळं कुटुंबीय निर्धास्त झालं.
मात्र आपला सापावर पाय पडला आहे ही गोष्ट अर्णवच्या मनातून गेली नव्हती. त्यामुळे तो प्रचंड घाबरलेला होता. त्यातच त्याला ताप आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा ताप कमी होत नसल्याचं लक्षात आलं. अधिक तपासण्या केल्या असता त्याच्या मेंदूत ताप गेल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार उपचारही सुरू झाले. परंतु उपचारादरम्यानच रविवारी सायंकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अर्णवच्या कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.