
मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर दाखल आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळल्याने गोरे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक महादेव पिराजी भिसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वडुज येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यामुळे जयकुमार गोरे व त्यांच्या साथीदारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयानेही गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे गोरे यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून त्यांच्या अटकेबाबत पोलिस काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.