
नागपूर : प्रतिनिधी
नागपूर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील लकडगंज परिसरात कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याखाली ५ अर्भके सापडली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पोलीस देखील चक्रावले आहेत. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज परिसरातील केटी वाईन शॉप्सजवळील कचरा डंपिंग यार्डमध्ये कचऱ्यात ५ अर्भके स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. नागरिकांनी तात्काळ या बाबत लकडगंज पोलिसांना कळवले. लकडगंज पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
पोलिसांनी पाचही अर्भके ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ही अर्भके कोणी व का टाकली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लकडगंज पोलिस करत आहे.