
मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर’ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे आता विदर्भातही अजितदादांच्या कामाचा धडाका अनुभवण्यास मिळणार आहे.
नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागपूरमधील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरंच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे.
विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी सचिन यादव यांच्याशी 9421209136 वर संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.