पुणे : प्रतिनिधी
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य यंत्रणेत कार्यरत कोरोना योद्ध्यांना सुरक्षा प्रदान करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेत पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातील ससुन रुग्णालयाला ५०० पीपीई किट देण्यात आले.
सध्या पुण्या-मुंबईत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा, अशी इच्छा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्याच्या ससुन रुग्णालयाला ५०० पीपीई किट देण्यात आले. या उपक्रमाबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे यांनी फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगावचे नगरसेवक संतोष भेडगे, पार्थ पवार फाउंडेशनचे ऑपरेशन मॅनेजर नचिकेत खरात उपस्थित होते.
मागील वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर अन्नधान्य, औषधे, मास्क, सॅनीटायझरची मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पार्थ पवार फाउंडेशनने केले आहे. त्याचबरोबर शासकीय यंत्रणा राबवत असलेल्या उपाययोजनेलाही हातभार लावत वैद्यकीय मदत देण्यात पार्थ पवार फाउंडेशनने पुढाकारा घेतला आहे.