मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले होते. हे निर्बंध शिथिल व्हावेत अशी मागणी विविध स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या असून टास्क फोर्सकडून अहवाल मागवून त्यावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. राज्यात आता कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सकडून सद्यस्थितीबाबत अहवाल मागवण्यात आला असून त्यावर चर्चा करुन पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य शासन `ओपनिंग अप´ अंतर्गत हे निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. अनलॉकच्या टप्प्यात लोकल सेवा सुरू करण्याबाबत लगेच निर्णय घेण्यात येणार नाही.
अशी असेल ‘ऑपनिंग अप’ प्रक्रिया
टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरू होणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळेल. दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे आहे.
‘ओपनिंग अप’ अंतर्गत राज्य शासन निर्बंध हटवण्याची तयारी करत आहे. कोणते निर्बंध हटवले जावेत? कुठल्या निर्बंधता शिथिलता आणावी? कार्यालयात किती कर्मचारी असावेत? याबाबतचा अहवाल टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर केला आहे. याबाबत टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल. त्यामध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.