Site icon Aapli Baramati News

Corona Virus : महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘नाईट कर्फ्यू’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारीबाबत निर्देश दिले असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

जालना येथे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात पुन्हा ‘नाईट कर्फ्यू’ बाबत संकेत दिले आहेत. राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळमध्ये ओणम सणादरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले.  त्यामुळे केरळमध्ये रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केरळपाठोपाठ महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही संचारबंदीचा निर्णय घेण्याची सूचना केंद्रीय गृह सचिवांनी दिली आहे.

राज्यातील सद्यस्थिती लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्याचा विचार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात पूर्वीप्रमाणेच नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असेही राजेश टोपे यांनी सांगितले.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version